नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पंतप्रधानाच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन;आमदार संजय गायकवाड व श्वेता महाले यांची उपस्थिती

0
51

बुलडाणा, (जिमाका) दि.9: हतेळी येथे नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह उद्घाटन दुरदृश्य प्रणालीव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. आमदार संजय गायकवाड व श्वेता महाले यावेळी उपस्थित होते. जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या गरिब, गरजू विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घटना असल्याचे मनोगत यावेळी व्यक्त केली.

जिल्हा स्त्री रुग्णालय धाड रोड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक प्रशांत पाटील आदि उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नव्याने निर्माण होणारे वैद्यकीय महाविद्यालये लाखो परिवारांचे सेवेचे केंद्र ठरणार आहे. या केवळ संस्था ठरणार नसून असंख्य परिवारांचे जीवन घडविण्याचा यज्ञ आहे. नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 900 जागा निर्माण होणार आहेत. त्यामुळे आता राज्यभरात सहा हजार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा उपलब्ध होतील. यामुळे दुर्गम भागात नव्या संधीची दालने उपलब्ध होतील. आयुष्मान कार्डच्या माध्यमातून लाखो परिवारांना मोफत उपचार, तर जनऔषधी केंद्रातून स्वस्तात औषधे मिळत आहे. कर कमी करून हृदयरोग आणि कॅन्सरवरील औषधोपचाराचा खर्च कमी करण्यात आला आहे. या माध्यमातून गरीब कुटुंबांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

 प्रत्येक नागरिकाला माफक दरात उच्च प्रतीची आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे. केंद्र व राज्य शासनाने वैद्यकीय महाविद्यालयांकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, तसेच वैद्यकीय अधिकारी निर्माण व्हावेत यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यामुळे राज्यात दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच आता येथे प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे. यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आता ग्रामीण भागातील विद्यार्थीही वैद्यकीय शिक्षणात अग्रक्रमी राहतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार स्वेता महाले म्हणाले की, अनेक वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणीचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे आनंद होत आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्याऱ्या जिल्ह्यातील गरजू, गरिब विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक घटना असून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.यामुळे वेळ, खर्चाची बचत होणार असून स्थानिकांना याचा लाभ होणार आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या प्रयत्नामुळे शासनाने वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले असून आज त्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रलंबित असलेले कामे शासन वेगाने मार्गी लावत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार संजय गायकवाड म्हणाले की, यापूर्वी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येण्याठी शर्तीचे प्रयत्न झाले आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या पाठपुरावामुळेच महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती झाली आहे. यांचा मला अभिमान आहे. दुर्धर आजार, मोठ्या शस्त्रक्रिया यांसाठी आता जिल्हा बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. यामुळे जिल्ह्यातील गोरगरीबांना मोठा फायदा होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून उच्च गुणवत्तेचे वैद्यकीय शिक्षण व अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय शिक्षणामध्ये आपले भविष्य घडविणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना या महाविद्यालयातून यशस्वी वाटचाल करता येणार आहे. यावेळी आपल्या मनोगतातून त्यांनी शासकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांविषयी थोडक्यात विवेचन केले.

कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविकातून अधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालया विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रणजितसिंग राजपूर यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here